Select Page

खादे मंडळ स्थापन करणे ही मोठी गोष्ट नाही परंतु ते चालविणे हे अवघड आहे. सर्व अडचणीवर मात करुन जे खंबीरपणे उभे राहते ते खरे मंडळ असेच आमचे दत्तसेवा मंडळ. दत्तसेवा मंडळाची स्थापना मा.श्री. आनंद माईंगडे (दादा) यांनी सन १९८४ साली केली. जर एखादे सामाजिक कार्य करायचे असेल तर आपल्याला समाजाचा विचार घेऊनच ते कार्य करावे लागते तसेच दादांना आपल्या गावाचा विकास व्हावा हा ध्यास होता पण ते त्यांच्या एकटयाने होणारे नव्हते म्हणून त्यांनी दत्तसेवा मंडळाची स्थापना केली. आज ३७ वर्षे झाली दत्तसेवा मंडळ स्थापन होऊन, गेल्या ३७ वर्षात मंडळाने अनेक विधायक कामे केली आहेत.

दत्तसेवा मंडळाच्या माध्यमातून श्री दत्त मंदिराचा जिर्णोध्दार करण्यात आला. यामागे एक छोटीशी घटना आहे. श्री. आनंद माईंगडे (दादा) हे आपल्या मित्रासमवेत गावी गेले होते. रात्री जेवल्यानंतर फिरत असताना गावच्या मध्यभागी असलेल्या घररुपी देवळात ग्रंथवाचन चालु होते. त्यांच्या मित्राने विचारले तेथे काय सुरु आहे ? तेव्हा दादा त्यांना घेऊन मंदिरात गेले, तेथे गेल्यावर त्यांनी विचारले तुम्ही म्हणता की, हे दत्त मंदिर आहे पण तेथे दत्त मुर्ती नाही. तेव्हा दादांनी त्यांना सांगितले की, मंदिराची ही जागा ही सार्वजनिक खेळण्याचे ठिकाण होते, त्यावर अतिक्रमण सुरु झाले. गावकऱ्यांनी त्यास विरोध करुन दत्त मंदिर बांधावे असे ठरविले व सर्व गावकऱ्यांनी सहकार्याने श्रमदान करुन मंदिर बांधले परंतु मुर्ती बसविण्यापूर्वी मिल कामगारांचा संप सुरु झाला त्यामुळे पुढील काम राहिले. त्यामुळे मंदिरात मुर्ती बसविली नाही. तेव्हा त्यांच्या मित्राने सूचना केली कि, या मंदिरात आपण मिळून दत्तमुर्तीची प्राणप्रतिष्ठा करुया. त्याप्रमाणेच दादांनी व त्यांच्या मित्राने आपल्या सहकाऱ्यांच्या व गावकऱ्यांच्या मदतीने दत्तमुर्तीची स्थापना केली व तेव्हापासून आजपर्यंत दत्त जन्मोत्सव मंडळामार्फ़त साजरा केला जातो. दत्त जन्मोत्सवाच्या वेळी पारायण सोहळा, भजन, किर्तन, व विविध खेळांच्या स्पर्धेचे आयोजन केले जाते.

दत्त मूर्तीची स्थापना झाल्यानंतर समाजास एकत्र ठेवण्यासाठी व कोणतेही कार्यक्रम यशस्वी करण्याची जिद्द असून आर्थिक परिस्थितीमुळे माणसाला त्यात अपयशी व्हावे लागते याचा विचार करुन मंडळाच्या माध्यमातून दत्तसेवा सहकारी पतपेढीची स्थापना करण्याचे ठरविण्यात आले. डिलाई रोड, मुंबई येथे मंडळाच्या माध्यमातून पतपेढी काढण्याचे मा. श्री. आंनद माईंगडॆ यांनी ठरविले परंतु डिलाई रोड येथे त्यावेळी परवानगी मिळाली नाही म्हणून मालवणी सारख्या अत्यंत मागास भागात पतपेढी काढण्याचे ठरविले व त्यानुसार सन १९८७ साली दत्तसेवा सहकारी पतपेढीची स्थापना करण्यात आली. प्रथम दोन वर्षे श्री. आनंद माईंगडे (दादा) यांच्या राहत्या घरात संस्थेचे काम चालु ठेवले. त्यानंतर मालवणी येथे जागा घेऊन कार्यालय सुरु केले. आज संस्थेच्या मालवणी, गोरेगाव, गोराई, जोगेश्र्वरी (प), कांदिवली, जोगेश्र्वरी (पू), मालाड (पू), बांबवडे, नायगाव ,शेडगेवाडी, म्हाडा मालवणी, दहिसर, भांडूप, नालासोपारा, तुरुकवाडी, मालकापुर, घाटकोपर,अंधेरी व विरार अशा एकुण १9 शाखा कार्यरत आहेत. सर्व शाखा संगणीकृत असून सर्व शाखा इंटरनेटने जोडण्यात आल्या आहेत. संस्थेचे खेळते भाग भांडवल 371 कोटी व सभासद संख्या 78695 आहे. दत्तसेवा सहकारी पतपेढीमध्ये 118 कर्मचारी व 116 दैनदिन प्रतिनधी असे एकुण २३4 कर्मचारी वर्ग आहे.

आमचे मंडळ “जनसेवा हिच ईश्वर सेवा” समजून कार्य करीत आहे. गेल्या ३७ वर्षात मंडळ सर्व कामात आघाडीवर आहे. मंडळामार्फत गुणवंत विदयार्थी सत्कार, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, गुणवंत शिक्षकांचा सत्कार,स्पर्धा मार्गदर्शन,मोफत शैक्षणिक साहित्य वाटप इत्यादी उपक्रम राबविले जातात. तसेच मंडळामार्फ़त म्हसोबा देवालयाचा जिर्णोध्दार करण्यात आला आहे. गावी अनेक उपक्रम राबविण्याचा मंडळाचा मानस आहे. त्यामध्ये शासन दरबारी पाझर तलावाबाबत पाठपुरवठा चालु आहे. तसेच अत्याधुनिक व्यायामशाळा, क्रिडा केंद्र, आरोग्य केंद्र, कृषी मार्गदर्शन केंद्र, जिल्हा बँकेची शाखा व सहकार बाजार इत्यादी.दत्तसेवा मंडळामार्फत दत्त सेवा पतपेढीच्या माध्यमातून दत्त सेवा क्रिडा मंडळ, दत्त सेवा गणेशोत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली.दत्त सेवा क्रिडा मंडळाने अनेक जिल्हास्तरीय स्पर्धेत यश संपादन करुन मंडळाचे नाव उज्वल केले आहे तसेच या क्रिडा मंडळातील खेळाडूंची निवड शासकीय सेवेत झाली आहे.

दत्तसेवा गणेशोत्सवामार्फत दरवर्षी संस्थेचा मुख्य कार्यालयात श्री गणेशाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते व त्यानिमित्त श्री सत्यनारायण पुजेचे आयोजन केले जाते. आजच्या स्पर्धेच्या युगात आपल्या ग्रामीण भागातील विदयार्थी कोठेही मागे पडू नये. तो मुंबई पुणे येथील विदयार्थ्यासारखा व्हावा, त्याच्यामधील कलागुणांना वाव मिळावा वत्यांचा बौध्दिक विकास व्हावा, उत्कर्ष व्हावा व आपल्या संपूर्ण भागाचे नाव महाराष्ट्रात व्हावे हेच एकमेव उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना २००३ साली मा. श्री. आनंदराव माईंगडे यांनी केली व दिनांक १८ जानेवारी २००४ रोजी विधानपरिषद सभापती श्री. शिवाजीराव देशमुख यांच्या शुभहस्ते पायापूजन केले. आपल्या भागात एक सुसज्ज व सर्व सोयीयुक्त अशी चांगली शाळा असणे हे दादांचे स्वप्न होते. त्यांची जिद्द व मंडळाच्या सहकार्याने दि.१६ जुन,२००५ रोजी शाळा सुरु झाली. इवली इवलीशी पाखरं शाळेच्या दिशेने येऊ लागली व त्यांच्या किलबिलाटाने शाळॆचा सर्व आसमंत खुलुन गेला अन दादांनी पाहिलेले स्वप्न सत्यात अवतरले. थोडयाच अवधीत शाळॆने भागात आपले नाव गाजविण्यास सुरुवात केली. कार्यक्षम शिक्षकवर्गाने आपल्या अथक प्रयत्नांनी मुलांना कोणत्याही स्पर्धेत भाग घेण्याचे मनोबल दिले म्हणूनच शाळेतील विदयार्थी विविध स्पर्धेत यश संपादन करु शकली. तेवढेच नव्हे तर राज्यस्तरीय रंगभरण स्पर्धेत १६२ मुलांनी भाग घेतला म्हणून शाळेतील शिक्षक श्री. कांबळे सर यांना “शिक्षकरत्न” पुरस्काराने गौरविण्यात आले.दादांचे व मंडळाचे प्रयत्न पाहता म्हणावेसे वाटते की, जेथे प्रयत्न तेथेच सुबत्ता व ईश्वर वास करतो. “साहसे श्री प्रतिवसति” असे म्हणतात ते काही खोटे नाही. “प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेल ही गळे” हा श्री समर्थाचा उपदेश मंडळाच्या यशाची गुरुकिल्ली ठरु शकेल.

श्री. नंदकुमार पाटील

मुख्य व्यवस्थापक, दत्तसेवा सहकारी पतपेढी मर्या, मुंबई